बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक   

वृत्तवेध 

थंड बिअरच्या शौकिनांसाठी एक चांगली बातमी आहे. उन्हाळा सुरूही झालेला नाही आणि बिअरप्रेमींनी मोठा विक्रम केला आहे. भारतात किंगफिशर, बिरा, बुडवेझर, टुबोर्ग इत्यादी ब्रँड्सची बिअर विकली जाते. किंगफिशरचा बाजारातील हिस्सा सुमारे ४२.४ टक्के आहे; पण कार्ल्सबर्ग सर्वाधिक खपलेली बिअर म्हणून पुढे आली आहे. कार्ल्सबर्गचा बाजारातील हिस्सा किंगफिशरपेक्षा कमी आहे; परंतु प्रीमियम विभागात तो वेगाने वाढत आहे. याच कारणामुळे एका वर्षात लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा एका वर्षात ६० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
 
खरे तर, बिअर उत्पादक कंपनी कार्ल्सबर्ग इंडियाचा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी नफा ६०.५ टक्क्यांनी वाढून ३२३.१ कोटी रुपये झाला आहे. कार्ल्सबर्ग यांनी कंपनी रजिस्ट्रार कार्यालयाला (आरओसी) याबाबत माहिती दिली आहे. बिझनेस इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म ‘टोफ्लर’द्वारे अ‍ॅक्सेस केलेल्या आर्थिक डेटानुसार ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कार्ल्सबर्ग इंडियाचे एकूण उत्पन्न १५.२ टक्क्यांनी वाढून ८,०४४.९ कोटी रुपये झाले आहे. ही कार्ल्सबर्गची भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. अशा प्रकारे कंपनीने ८,००० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला.
 
कंपनीने सांगितले की २०२३-२४ या आर्थिक वर्षात सिंगल फायनान्शियल स्टेटमेंटअंतर्गत तिचा नफा ३२३ कोटी रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे, की बिअर उद्योगाने व्हॉल्यूमच्या बाबतीत चांगली प्रगती केली आहे. आर्थिक वर्षात कंपनीची रोकड आणि बँक शिल्लक अनुक्रमे ९३०.४ कोटी रुपये आणि  १,११६.५ कोटी रुपये झाली आहे. ‘कार्ल्सबर्ग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण २०१.३ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न ६,९३७ कोटी रुपये होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीचा उत्पादन शुल्क खर्च १३.४ टक्क्यांनी वाढून ४,८७७.८ कोटी रुपये झाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ते ४,३०१.६ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कार्ल्सबर्ग इंडियाचा जाहिरात मोहिमेचा खर्च ९६.५ कोटी रुपये होता. तिचा एकूण खर्च १३.४ टक्क्यांनी वाढून ७,६२८.३ कोटी रुपये झाला आहे.

Related Articles